कणकवली येथे शिक्षकांसाठी ‘शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा’ संपन्न ; प्रसिद्ध गणिततज्ज्ञ पंढरीनाथ राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन

0 minutes, 3 seconds Read

 

​कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (शाखा-कणकवली) आणि पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘शिष्यवृत्ती एकदिवसीय मार्गदर्शन वर्ग’ आज शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी प.पू. भालचंद्र महाराज सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

​कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध गणिततज्ज्ञ पंढरीनाथ राणे उपस्थित होते. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना गणितातील प्रश्नांची अचूक उत्तरे कमी वेळात कशी मिळवता येतील, याचे तंत्र त्यांनी शिक्षकांना अवगत करून दिले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कणकवली शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपस्थित असलेले गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आणि केंद्रप्रमुख विजय भोगले यांनी शिक्षक समितीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले व आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.

 

​यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, गणिततज्ज्ञ पंढरीनाथ राणे, तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज, महिला तालुकाध्यक्षा दर्शना हुंबे, धीरज हुंबे, अजय तांबे, जगदीश गोसावी, केंद्रप्रमुख विजय भोगले, तालुका सरचिटणीस निलेश ठाकूर, शिक्षक नेत्या नेहा मोरे, प्रवीण कुबल, गटसाधन केंद्राच्या प्रज्ञा दळवी, पाळेकर, तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी संदीप कदम, संतोष मराठे, रचना गवाणकर आणि मंगेश खांबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, संचालक श्रीकृष्ण कांबळी, जिल्हा संघटक ईश्वरलाल कदम यांनी सदिच्छा भेट दिली.

 

​कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन ज्येष्ठ कवयित्री व शिक्षिका सरिता पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अजय तांबे यांनी मानले. या कार्यशाळेला कणकवली तालुक्यातील सुमारे ८० शिक्षकांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. ‘न्यायाची चाड, त्याग आणि सेवा’ या ब्रीदवाक्यानुसार शिक्षक समितीने राबवलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *