वेंगुर्ले (प्रतिनिधी) स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना लोडिंगचे काम देण्यात येत असल्यामुळे रेडी बंदराच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. स्थानिकांना काम न दिल्यास त्यापुढे एकही किलो सुध्दा माल जाऊ देणार नाही, असा इशारा रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी बंदराच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
दोन दिवसापूर्वी रेडी बंदरात मोठी बोट दाखल झाली आहे. दोन दिवसात लोडिंगचे काम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरपंचासह ग्रामस्थांनी आज रेडी बंदराचे अधिकारी संदीप चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी माजी सरपंच अंनत कामली, चित्रा कन्यालकर, पराग शिरोडकर, संदीप कामली, विकास सूर्याजी, सागर रेडकर, जगदीश गवंडी, आशिष शिरोडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, अर्नेस्ट जॉन ग्रुपच्या माध्यमातून २००९ पासून हे बंदर चालवण्यात येत आहे. त्यावेळी स्थानिक लोकांना काम देण्यात येत होते मात्र मागच्या वर्षी कणकवली येथील एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली एका बाहेरच्या व्यक्तीला काम देण्यात आले आहे. मात्र संबंधित व्यक्ती स्थानिक लोकांना काम न देता बाहेरील व्यक्ती आणून या ठिकाणी लोडिंगचे काम करत आहे. त्यामुळे स्थानिकांवर बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आज बंदराच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. जोपर्यंत स्थानिकांना या प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही तोपर्यंत एक किलोही मालची आम्ही वाहतूक होऊ देणार, नाही असा इशारा दिला आहे.
