कणकवली (प्रतिनिधी)
संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना कलारत्न पुरस्कार जाहीर : 18 एप्रिलला मुंबई येथे भव्य कार्यक्रमात होणार प्रदान
बदलापूर येथून गेल्या ३० वर्षापासून प्रसिद्ध होणाऱ्या लोकप्रिय उल्हास प्रभात न्युज पेपर व उल्हास प्रभात न्यूज चॅनेल तर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यातील कलारत्न पुरस्कार 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर यांच्या संदेश पत्र संग्रहाच्या चळवळीसाठी जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 18 एप्रिल रोजी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.
निकेत पावसकर गेली 19 वर्षे संदेश पत्रांचा आगळावेगळा संग्रह करीत आहेत. ही चळवळ स्वतः पुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही विविध ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगळी प्रेरणाही मिळत आहे. तर जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून लेखनाची आवड पुन्हा मुलांमध्ये रुजविण्याचे काम गेली चार वर्षे सातत्याने केले जात आहे.
या संग्रहात देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील भारतीय पोस्ट कार्डवर संदेश पत्रे त्यांच्या संग्रही आहेत. यामध्ये 1700 पेक्षा जास्त संदेश पत्रे असून त्याबद्दल सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरून तीनवेळा तर सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरून दोनवेळा मुलाखत प्रसिध्द झाली आहे. तर राज्यातील विविध वृत्तपत्रात त्यांच्या या संग्रहाचा गौरव करण्यात आलेला आहे. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम वरही त्यांच्या या चळवळीचा गौरव करण्यात आलेला आहे.
या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहाबद्दल कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टकडून देण्यात येणारा अक्षरघर संकल्पक पुरस्कार 2023 तसेच रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टकडून देण्यात येणारा कार्यगौरव पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले आहे. हा जाहीर झालेला कलारत्न पुरस्कार 2025 आमदार किसन कथोरे, दैनिक सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव आणि उल्हास प्रभात न्युज पेपर चे संपादक डॉ. गुरुनाथ बनोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्काराबद्दल पावसकर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
संदेश पत्र पोस्ट कार्डवरच का?
या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्ट कार्डवर आले. तसेच पोस्ट कार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने आणि आपली काहितरी वेगळी खासियत असावी यासाठी संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतली जातात.
