देवगड (प्रतिनीधी)
धाराशिव येथील शैक्षणिक सहल घेऊन आलेल्या एसटीला देवगडमध्ये भीषण अपघात ; खाकशी येथील तीव्र वळणावर झाला अपघात ; एसटीच्या धडकेने नळयोजनेची पाईपलाईन फुटली ; चार विद्यार्थी किरकोळ जखमी
खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळयोजनेच्या पाईपलाईनला धडकून झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे . एसटी नळयोजनेच्या पाईप लाईनला धडकल्याने पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले त्यामुळे देवगड जामसंडे शहराच्या पाणीपुरवठा बंद झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती समजताच देवगड आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसने देवगडमध्ये आली होती . दुपारी मिठमुंबरी येथे जेवण करून ही सहल खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायकवाड यांचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली गेली. सुदैवाने झाडेझुडपे आंबा बागायत व देवगड नळयोजनेची पाईपलाईन असल्याने त्या पाईपलाईनला जाऊन एसटी धडकली. मात्र एसटीच्या धडकेने पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले. अपघाताची भीषणता एवढी होती की पाईपलाईनचे दोन तुकडे झाले व नळयोजनेच्या जॉईंटला तडे गेले आहेत. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही. बस मध्ये ४४ विद्यार्थी व ४ शिक्षक असे एकूण ४८ जण होते.मात्र बसमधील चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.अपघाताची माहिती समजतात स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले.

