नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची किल्ले विजयदुर्ग स्वच्छता मोहीम हजारो श्रीसदस्यांच्या साक्षीने संपन्न.
विजयदुर्ग (प्रतिनिधी)
गेली आठ दशक समाज जागृतीचं व्रत घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जिल्ह्य़ातील हजारो श्रीसदस्यांनी महास्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. निमित्त होतं ते विजयदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळालं. महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळाले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश आहे.
दरम्यान, मराठा आरमाराची राजधानी असलेला आणि इंग्रज, पोर्तुगीज, डच या परकीय सत्तांविरोधात लढाया जिंकलेल्या किल्ल्याची निवड युनेस्कोच्या यादीत व्हावी यासाठी असंख्य शिवप्रेमी आतुर झाले असून विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळात समाविष्ट व्हावा या एकाच ध्यासाने सर्व शिवप्रेमी एकवटले आहेत. आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो श्रीसदस्यांनी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत अथक स्वच्छता मोहीम राबवली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आणि त्या त्या तालुक्यातील गावोगावचे श्रीसदस्य या स्वच्छता मोहिमेत फार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिस्तबद्ध पद्धतीने आणि नेमून दिलेले काम नियोजनानुसार करून किल्ल्यातील अनेक बुरुज, पुरातन वास्तूंची साफसफाई करण्यात आली. छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतलेली आणि विस्तारित केलेली ही मराठा आरमाराची वास्तू श्रीसदस्यांच्या उत्स्फूर्त मेहनतीने पावन झाली. गवत, वाढलेली झाडेझुडपे, कचरा आदींची साफसफाई करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रीसदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
यासंदर्भात किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर झालेल्या श्रीसदस्यांच्या महास्वच्छता मोहिमेचे स्वागत करताना त्यांच्या शिस्तीचे आणि मेहनतीचे विशेष कौतुक केले. समितीचे सचिव बाळा कदम यांनी जागतिक वारसा स्थळात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश झाला तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चा मोलाचा वाटा असेल, असं सूचित केलं.
यावेळी विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, माजी उपसरपंच महेश बिडये, प्रेरणोत्सव समितीचे संचालक प्रदीप साखरकर, रविकांत राणे, सह्याद्री प्रतिष्ठान चे जिल्हा सचिव दिपक करंजे, तलाठी श्री. तानवडे, पोलीस पाटील राकेश पाटील, किल्ल्याचे कर्मचारी यांनी मोठे सहकार्य केले. दरम्यान, देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी या स्वच्छता मोहिमेला परवानगी देऊन 108 रुग्णसेवा सकाळी सात वाजल्यापासून उपलब्ध केली याबद्दलही विजयदुर्गवासीयांनी त्यांचे विशेष आभार मानले.

