दुर्गाडी डोंगराच्या साक्षीने रंगणार ‘बाळूमामा स्पोर्ट्स चषक २०२६’ ; आचिर्णे धनगरवाडा येथे भव्य खुली अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा; रोख पारितोषिकांसह चषकांची रेलचेल

0 minutes, 1 second Read

 

वैभववाडी (तुषार शिंगाडे)

 

आचिर्णे धनगरवाडा येथील दुर्गाडी डोंगराच्या पायथ्याशी, निसर्गरम्य वातावरणात “बाळूमामा स्पोर्ट्स चषक २०२६” या भव्य खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जय मल्हार दुर्गोबा मंडळ, आचिर्णे (दार्ये धनगरवाडा) व जय मल्हार मित्र मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि. १ मार्च रोजी ही स्पर्धा रंगणार आहे.

डोंगर-दऱ्या आणि कड्याकपाऱ्यांच्या साक्षीने, निसर्गाच्या सान्निध्यात धनगर समाज बांधवांनी आयोजित केलेली ही स्पर्धा यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या स्पर्धेमागील मुख्य हेतू आहे.
या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्या रिद्धी सुतार व पंचायत समिती सदस्य सिद्धेश रावराणे यांचीही उपस्थिती असणार आहे.

स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ९,९९९/- रुपये व आकर्षक चषक, तर द्वितीय पारितोषिक ५,५५५/- रुपये व चषक असे असणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गोलंदाज, शिस्तबद्ध संघ, सामनावीर, मालिकावीर यांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी संघालाही सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असल्याने स्पर्धेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात, खेळाडूवृत्ती आणि बंधुभाव यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आचिर्णे धनगरवाडा वासियांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *