देवगड / प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात प्रत्येकाकडे एकाग्रता व आत्मविश्वास असणे गरजेचे – सुशांत नाईक
देवगड इंद्रप्रस्थ हॉल येथे तालुक्यातील दहावी बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या युवा सेनेच्या वतीने सन्मान
सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे. खेळ असो, अभ्यास असो की डिजिटल युग असो… आज सर्वच क्षेत्रात गुणवत्तेची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाकडे एकाग्रता व आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी हे सिंधुदुर्गचे भविष्य आहेत. सिंधुदुर्गच्या भविष्यातील जडणघडणीत आजच्या विद्यार्थ्यांनी मोलाचा वाटा उचलावा. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यातून सिंधुदुर्गच्या पुढील भवितव्याचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी येथे व्यक्त केले.
ठाकरे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेत देवगड तालुक्यातील शाळांमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी पार पडला. ठाकरे शिवसेना-युवासेना देवगड यांच्यावतीने व सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सुशांत नाईक बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा उबाठा शिवसेनेचे विधानसभाप्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव-सावंत, उपजिल्हाप्रमुख यदू ठाकुर, संदीप कदम, युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख हर्षा ठाकुर, जि. प. माजी सदस्य विष्णू घाडी, माजी सभापती संजय देवरुखकर आदी उपस्थित होते.
