देवगड (प्रतिनिधी)
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याद्वारे जीवनाचा जो खरा मार्ग आहे तो दाखवणारा कोणता धम्म असेल तर तो बौद्ध धम्म – प्रा सीमा हडकर
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याद्वारे जीवनाचा जो खरा मार्ग आहे तो दाखवणारा कोणता धम्म असेल तर तो बौद्ध धम्म असे प्रतिपादन कणकवली कॉलेजच्या प्राध्यापिका सीमा हडकर यांनी केले. सम्यक प्रबोधिनी (जामसंडे) मुंबई गाव शाखेच्या विद्यमाने जामसंडे बुद्धविहार येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सीमा हडकर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. गौतम बुद्ध म्हणजे ज्ञानाचे भांडार होते. गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म आपण समजून घेतला पाहिजे. गौतम बुद्धांची चार आर्य तत्वे, दुःख निवारणासाठी बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग, बुद्धांची पाच निती तत्त्वे याविषयी आपल्या ओघवत्या भाषाशैलीतून सखोल धम्म प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना त्यापुढे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब व गौतम बुद्ध आजही आपल्याला समजलेले नाहीत. समाज परिवर्तनामध्ये आपण कमी पडत आहोत.
ग्रामीण भागामध्ये प्रथम धम्म चळवळ निर्माण केली पाहिजे. स्त्री चळवळ गतिमान होण्यासाठी स्त्री पुरुषानी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकताना त्या म्हणाल्या, युद्धाची नाहीतर आज आपल्या देशाला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची गरज आहे. बौद्ध धम्म हा घराघरात पोचला पाहिजे. माणसाला माणसासारखे जगता यावे यासाठी डॉ. बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म स्वीकारला. याद्वारे डॉ. बाबासाहेबांना देशात सम्यक क्रांतीचे युग आणायचे होते असे सांगताना कालमार्क आणि गौतम बुद्धांच्या सिद्धांतावर त्यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात अध्यक्ष विलास जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण तर नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन व आजी माजी सचिव राजेंद्र जाधव व पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिसरण धम्म संस्कार पठण पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय यश संपादन केलेल्या अपर्णा जाधव, प्रचिता जाधव, श्रावणी जाधव, समीक्षा जाधव, आर्या मंचेकर,तन्वी जाधव, नुर्वी जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
