गोवर्धन गोशाळा म्हणजे जैविक शेती, धार्मिक आस्था आणि पर्यावरण पूरक प्रकल्प – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 minutes, 2 seconds Read

 

कणकवली,(प्रतिनिधी)

गोवर्धन गोशाळा म्हणजे जैविक शेती, धार्मिक आस्था आणि पर्यावरण पूरक प्रकल्प – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“बाळासाहेबांच्या ढाण्या वाघाला बघून जंगलातील वाघही पळून गेला” – शिंदेंचा मिश्कील टोला

          कोकणातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या गोवर्धन गोशाळा प्रकल्पाचे उद्घाटन करताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोशाळेच्या सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकला.
“हा प्रकल्प जैविक शेती, धार्मिक आस्था आणि पर्यावरण पूरकतेचा त्रिवेणी संगम आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

 

राणेंचे नेतृत्व आणि धाडसी निर्णय घेण्याची वृत्ती यांची प्रशंसा करताना शिंदे म्हणाले,

 

> “हातात घेतलेले कोणतेही काम पूर्ण करण्याची राणेंची खासियत आहे. गोवर्धन गोशाळा याचे उत्तम उदाहरण आहे. कोकणात यामुळे निश्चितच धवल क्रांती होईल आणि समृद्धीचे नवे दालन खुले होईल.”

‘वाघाचा’ किस्सा – मिश्कील शैलीत शिंदेंचा टोला
यावेळी शिंदेंनी खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वाघाच्या किस्स्याचा संदर्भ देत मिश्कीलपणे सांगितले,

> “राणेंनी सांगितले की गोशाळेसाठी करंजेत जमिनीच्या पाहणीसाठी गेले असताना झाडावर वाघ बसलेला होता. आम्हाला पाहताच तो वाघ झाडावरून खाली उतरून जंगलात गेला. त्यामुळे, बाळासाहेबांच्या ढाण्या वाघाला पाहून जंगलातील वाघ पळून गेला, हे आश्चर्य नाही!”

कोकणाच्या निसर्गसंपन्नतेचे महत्त्व अधोरेखित करत शिंदे म्हणाले,

> “कोकणात आलं की देवभूमीत आल्यासारखं वाटतं. या निसर्गसंपन्न भूमीत राणेंनी गोवर्धन गोशाळेसारखा पर्यावरणस्नेही प्रकल्प उभारून सिंधुदुर्गच्या विकासाला हातभार लावला आहे.”

गाय ही उपयुक्तता आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याचे सांगत शिंदे यांनी गोशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला.

 

 

> “गाय ही केवळ पवित्र नसून, ती उपयुक्तही आहे. या प्रकल्पामुळे जैविक शेतीला चालना मिळेल, धार्मिक श्रद्धांना बळकटी मिळेल आणि पर्यावरण सुद्धा संवर्धित होईल,” असे ते म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *