कणकवली(प्रतिनिधी)
राणेंना ‘शक्तिपीठ’ विकासासाठी हवा की मायनिंग लॉबीसाठी ? ; ठाकरे शिवसेना नेते परशुराम उपरकर यांचा सवाल
नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी कळणे मायनिंग प्रकल्पास परवानगी दिली. मुळात जिल्ह्यात मायनिंग व्यवसायाचा जन्मच राणेंनी घातला. आता शक्तिपीठ मार्गावरून विरोधकांना राणे धमक्या देत आहेत. मुळात त्यांना शक्तिपीठ महामार्ग विकासासाठी हवाय की मायनिंग लॉबीसाठी? हे त्यांनी जनतेसमोर जाहीर करावे. राणेंच्या धमक्या सर्वांनाच आता माहीत झाल्या आहेत, त्यांनी धमक्या देणे बंद करावे, असा टोला ठाकरे शिवसेनेचे नेते माजी आ. परशुराम उपरकर यांनी लगावला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध खपवून घेणार नाही, असा इशारा खा. नारायण राणे यांनी दिला होता. यावर बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, ठाकरे शिवसेनेचे पाच पदाधिकारी एकत्र आल्यानंतर नारायण राणे हे अस्वस्थ झाले आहेत. गेल्या ३० वर्षात राणे यांनी काय आणि कोणता विकास केला? हे त्यांनाच माहिती आहे. कासार्डेतील बेकायदा मायनिंगप्रकरणी तक्रारी असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. तडीपार करेन, फटके देईन, बघून घेईन अशा राणेंच्या धमक्यांची सवय आता लोकांना झाली आहे.
सी-वर्ल्ड प्रकल्पात आवश्यकतेपेक्षा जास्त जमीन संपादनाचा घाट घातल्याने स्थानिकांनी विरोध केल्यानंतर स्थानिकांना तडीपार करण्याची धमकी नारायण राणे यांनी दिली होती. मात्र २०१४ च्या
निवडणूकीत लोक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि राणेंनाच पराभूत केले. राणेंची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली त्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेतल्यानंतर त्यांच्याकडे उद्योग खाते आले, त्यावेळी त्यांनी जिल्हयात किती उद्योग आणले व किती रोजगार दिले हे जाहीर करावे,
केंद्रीय उद्योगमंत्री असताना राणे यांनी किती लोकांना रोजगार दिला? किती उद्योग आणले?
सिंधुदुर्गनगरीत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली होती.ती कधी पूर्ण होणार ? हे सांगावे असे आवाहन श्री.उपरकर यांनी केले.
मंत्री म्हणून राणेंनी जिल्ह्यासाठी काय केले?
सावंतवाडी-दोडामार्ग पट्टयात मोठ्या प्रमाणावर मायनिंग सुरू आहे. त्या मायनिंग लांबीच्या सोयीसाठीच राणे शक्तिपीठ मार्गाचे समर्थन करीत आहेत. व्याघ्र कॉरिडॉरमुळे सोनवडे घाट मार्ग रखडला आहे. राणे यांनी त्यासाठी केंद्रीयमंत्री असताना किती बैठका घेतल्या? राणे यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जी वनसंज्ञा लावली ती ते महसूलमंत्री व केंद्रीयमंत्री होवूनही काढू शकले नाहीत, अशी टीका उपरकर यांनी केली.
