कासार्डे सिलिका उत्खनन क्षेत्रातील पाणी उपसा टेंडर थांबवा – सुशांत नाईक

 

कणकवली( प्रतिनिधी)

 

 

कासार्डे सिलिका उत्खनन क्षेत्रातील पाणी उपसा टेंडर थांबवा – सुशांत नाईक

 

 

संपूर्ण पियाळी नदीतील पाणी दूषित होण्याचा धोका

 

 

 

 

 

कासार्डे सिलिका उत्खनन क्षेत्रातील एका तळीमध्ये वॉशिंग प्लांटमधील दूषित पाणी साठले आहे. या तळीतील पाणी उपसा झाला तर संपूर्ण पियाळी नदीतील पाणी प्रदूषित होऊन शेती, बागायतीसह अनेक गावांच्या नळपाणी योजना धोक्‍यात येणार आहेत. त्‍यामुळे कासार्डे येथील पाणी उपसा टेंडर थांबवा अशी मागणी युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज केली. याबाबतचे निवेदन त्‍यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले.
नाईक म्‍हणाले, कासार्डे मायनिंग क्षेत्रातील साडे तीनशे फूट खोल आणि १४ एकर क्षेत्रात पसरलेल्‍या तळ्यातील पाणी उपसा करण्याचे टेंडर शासनाने काढले आहे. वाळू धुण्यासाठी वापरण्यात आलेल्‍या विषारी घटकांमुळे हे संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. या पाण्याचा उपसा झाला तर या परिसरातील नद्या प्रदूषित होणार आहेत. दूषित पाण्यामुळे शेती बागायतीसह पिण्याच्या पाणी पुरवठा योजना बाधित होणार आहे. त्‍यामुळे येथील पाणी उपसा टेंडर थांबविण्यात यावे अशी मागणी युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज केली. यावेळी तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड, तेजस राणे, गुरु पेडणेकर, वैभव मालंडकर, महेश कोदे, अनुप वारंग उपस्थित होते.
श्री.नाईक म्‍हणाले, कासार्डे परिसरात अनेक सिलिका मायनिंग कंपन्या तेथील सिलिका काढतात. यातील महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेट लिमिटेड या सिलिका उत्खनन करणाऱ्या कंपनीला त्या परिसरातील साडे तीनशे फूट खोल आणि १४ एकर क्षेत्र परिसर असलेल्‍या तळ्यातील पाणी उपसा करण्याचे टेंडर मिळाले आहे. या तळ्यात पावसाचे पाणी तसेच सिलिका धुतल्‍यानंतरचे पाणी साठले आहे. येथील मायनिंग व्यावसायिक सिलिका धुण्यासाठी कॉस्टींग सोडा व इतर विषारी घटक वापरतात. वाळू धुतल्‍यानंतर ते पाणी या तळ्यात साठून राहते. त्‍यामुळे या तळ्यातील पाणी उपसण्याला स्थानिकांचा नेहमीच विरोध राहिला आहे. आता या पाण्याचा उपसा झाला तर पियाळी नदीचे पाणी प्रदूषित होणार आहे. त्‍याचा मोठा फटका नांदगाव, पियाळी, असलदे, कोळोशी, आयनल या गावांना बसणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *